Samay Raina कुठे गेला ? आसाम पोलिसांचे पथक पुण्यात

पुणे: यूट्यूबवरील ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये अश्लीलतेचा प्रचार केल्याच्या आरोपावरून ईशान्य भारतातील एका राज्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कॉमेडियन समय रैना याला समन्स बजावण्यासाठी आसाम पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले होते. गुरुवारी (दि. १३) रात्री उशिरा बाणेर पोलीस ठाण्याच्या मदतीने पोलिसांनी रैनाच्या घरी समन्स बजावले.

वादग्रस्त वक्तव्यावरून देशभर संताप
या शोदरम्यान समय रैना आणि यूट्यूबर रणवीर अलाहबादिया यांनी लैंगिक संबंधांवर भडक आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. त्यांच्या वक्तव्याविरोधात देशभरात संताप व्यक्त होत असून, अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

समय रैनाचा पुण्यातील बाणेर परिसरात फ्लॅट असल्याने, त्याला समन्स बजावण्यासाठी आसाम पोलिस पुण्यात आले. मात्र, तो घरी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अलाहबादिया, चंचलानी यांना आधीच समन्स
या प्रकरणात रणवीर अलाहबादिया, आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा माखिजा यांच्यावरही कारवाई सुरू आहे. आसाम पोलिसांनी अलाहबादिया आणि चंचलानी यांना आधीच समन्स बजावले आहे आणि त्यांना व्यक्तिगतरित्या हजर राहण्यास सांगितले आहे.

महाराष्ट्र सायबर पोलिसांचा तपास सुरू
महाराष्ट्र सायबर पोलिस आणि मुंबई पोलिस देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत किमान ५० जणांना समन्स पाठवण्यात आले असून, त्यामध्ये शोमध्ये सहभागी झालेल्यांचाही समावेश आहे. समय रैनाला १८ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र त्याने वेळ मागितली आहे.

समय रैना कुठे ?
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, समय रैना सध्या अमेरिकेत असून त्याच्या शोच्या कार्यक्रमात व्यस्त आहे. त्यामुळे तो चौकशीसाठी कधी हजर राहील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुढील तपास सुरू
या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कंटेंटवर सरकार आणि सायबर पोलिसांकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment