पुण्यात भीषण अपघातांची मालिका ! चार ठिकाणी अपघात, चार जण ठार – पुण्यातील रस्ते बनले मृत्यूचे सापळे?

पुणे: शहरात गेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. सदाशिव पेठेतील ना. सी. फडके चौक, पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग आणि नगर रस्त्यावर वाघोली येथे ही दुर्दैवी अपघातांची नोंद झाली आहे.

१. पद्मावती परिसर:
पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात भरधाव टेम्पोने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने विजय शंकर रेळेकर (५५, रा. आंबेगाव) यांचा मृत्यू झाला. सहकारनगर पोलिसांनी टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, तो अद्याप फरार आहे. अपघातानंतर पसार झालेल्या चालकाचा शोध पोलीस उपनिरीक्षक फकीर घेत आहेत.

२. सदाशिव पेठ:
ना. सी. फडके चौकात भरधाव कारच्या धडकेत रूपचंद सदाशिव घोणे (८०, रा. पर्वती) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलाने चंद्रशेखर घोणे (५०) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक इस्माइल शेख अधिक तपास करत आहेत.

३. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग:
वडगाव उड्डाणपुलाजवळ सेवा रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने लावलेल्या खासगी बसवर आदळून शुभम शुक्ला (३६, रा. बाणेर-सूस रोड) यांचा मृत्यू झाला. बसचालक दिगंबर बाळासाहेब शिंदे (३२, रा. मालाड, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करत आहेत.

४. नगर रस्ता (वाघोली परिसर):
वाहनाच्या धडकेत विठ्ठल बालाजी जमदाडे (४६, रा. एसटी कॉलनी, वाघोली) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी सीमा जमदाडे (३२) यांनी फिर्याद दिली असून, वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Comment