पुणेकर इकडे लक्ष द्या ! गणेशोत्सवासाठी मोठा बदल

पुणे : उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती बनविण्यावर बंदी घातली असून, त्यानुसार पुणे महापालिकेने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार पीओपीच्या मूर्तींचे उत्पादन तसेच विसर्जन पूर्णपणे बंद असेल. नियमाचे उल्लंघन झाल्यास पर्यावरण अधिनियमातील तरतुदींनुसार कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी मूर्तिकारांना शाडू मातीच्या मूर्तीच बनवाव्या लागतील.

केंद्रीय पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने मे २०२० मध्ये गणेशमूर्ती विसर्जनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली होती. त्यास अनुसरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमावली जाहीर केली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीत, ३० जानेवारी रोजी न्यायालयाने सर्व महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पीओपी मूर्तींचे उत्पादन आणि विसर्जन यावर पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश दिले.

पालिकेच्या सुधारित नियमावलीनुसार, महापालिका क्षेत्रात नैसर्गिक, पर्यावरणपूरक आणि जैवविघटनशील पदार्थांपासूनच गणेशमूर्ती तयार कराव्या लागतील. पीओपी, प्लास्टिक, थर्माकोल यांसारख्या हानिकारक पदार्थांचा वापर करण्यास बंदी असेल. तसेच, मूर्तींसाठी जैवविघटनशील आणि बिनविषारी रंगांचा वापर करावा, कृत्रिम रंग, ऑइल पेंट्स आणि विषारी रसायनांचे सेवन टाळावे. पूजेसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि दागिने नैसर्गिक घटकांपासून बनवण्यावर भर दिला जाणार आहे.

महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणाऱ्या मूर्तिकार आणि विक्रेत्यांकडूनच मूर्ती खरेदी करावी. यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास मदत होईल आणि नियमांचे पालन सुनिश्चित केले जाईल.

Leave a Comment