पुणे: पुणे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात बनावट मृत्यू दाखला तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलिसांनी कोंढवा क्षेत्रीय कार्यालयातील डेटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल रमेश निगडे आणि शुभम संजय पासलकर यांना अटक केली आहे.
याप्रकरणी महापालिकेच्या संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. तसेच, या अधिकाऱ्यांना तपासासाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बनावट मृत्यू दाखल्याचा गूढ कट
पुण्यातील कॅम्प भागात राहणाऱ्या एका व्यक्तीची श्रीवर्धन, कोकण येथे एक एकर जमीन होती. २०१९-२०२१ या कालावधीत बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन विकली गेली. वास्तविक मालकाने जेव्हा ही बाब उघडकीस आणली, तेव्हा त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी चौकशी केली असता, जमिनीच्या व्यवहारात सहभागी असलेल्या व्यक्तीचा पत्ता कात्रज येथे आढळला. मात्र, अधिक तपास करत असताना संबंधित व्यक्ती २०२१ मध्येच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली!
महापालिकेच्या नोंदींमधील गोंधळ उघड
पोलिसांनी जेव्हा मृत्यू प्रमाणपत्राची अधिकृत नोंद मागवली, तेव्हा महापालिकेकडून २०२१ मध्ये संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, अचानक एप्रिल २०२४ मध्ये नव्याने मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे आढळून आले!
यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी महापालिकेकडे मृत्यू नोंदणी कोणी केली, प्रमाणपत्रासाठी कोणते कागदपत्र सादर झाले, याचा तपशील मागवला. मात्र, महापालिकेकडे या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती नव्हती!
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू
पोलिस तपासाच्या आधारे नोंदणी करणाऱ्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना तातडीने अटक करण्यात आली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला जात असून, ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांवर कडक नियम लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
महापालिका प्रशासनाची प्रतिक्रिया
या प्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डाॅ. निना बोराडे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले,
“बनावट मृत्यू प्रमाणपत्राबाबत चौकशी सुरू आहे. संबंधित कालावधीत अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आला आहे. ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना हटवण्यात आले असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर नियम लागू करण्यात येतील. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना लवकरच सादर केला जाईल.”