Pune GBS News : महिनाभरापासून पुणे विभागात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अखेर सार्वजनिक आरोग्य विभागाने या उद्रेकामागील संभाव्य कारण शोधले असून, कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरस या जीवाणू व विषाणू संसर्गामुळे हा उद्रेक झाल्याची माहिती शुक्रवारी दिली.
GBS रुग्णसंख्या २०५ पार
पुणे विभागात ९ जानेवारीपासून GBS च्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून, सध्या हा आकडा २०५ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, यातील १०६ रुग्ण (५१ टक्के) हे सिंहगड रस्त्याच्या ५ किलोमीटर परिसरातील आहेत. उर्वरित ९९ रुग्ण पुणे शहर, ग्रामीण भाग आणि जिल्ह्याच्या इतर भागांमध्ये आढळले आहेत. सिंहगड रस्ता परिसरात आढळलेल्या ९० रुग्णांनी नांदेड गावातील विहीर आणि खडकवासला धरणाच्या पाण्याचा वापर केला होता. या भागातील ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी २ मृत्यू थेट GBS मुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
GBS संसर्गामागे दूषित पाणी?
सिंहगड रस्ता परिसरातील GBS रुग्णांच्या वैद्यकीय तपासणी दरम्यान, २५ रुग्णांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू तर ११ रुग्णांमध्ये नोरोव्हायरस आढळून आला. आरोग्य विभागाने या भागातील विविध पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने तपासले, त्यामध्ये ४० नमुन्यांचे अहवाल हाती आले आहेत. यातील निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत:
८ नमुन्यांमध्ये कोलिफॉर्म
२५ नमुन्यांमध्ये ई-कोलाय आणि कोलिफॉर्म
६ नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस
१ नमुन्यात कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी
GBS रुग्णसंख्येत वाढीची कारणे
GBS हा एक दुर्मिळ पण गंभीर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून, तो शरीराच्या प्रतिकारशक्तीला परिणाम करतो. यामुळे मांसपेशी कमकुवत होतात, अंशतः किंवा संपूर्ण शरीराचे पक्षाघात होण्याची शक्यता असते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू दूषित पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करू शकतो आणि GBS चा संभाव्य कारण ठरू शकतो. तसेच, नोरोव्हायरस हा संसर्गजन्य विषाणू असून, तो दूषित अन्न-पाण्यामुळे पसरतो.
आरोग्य विभागाची पुढील पावले आणि प्रतिबंधात्मक उपाय
दूषित पाणी आणि संभाव्य संसर्गाची साखळी रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. खडकवासला धरण आणि नांदेड भागातील पाणीपुरवठा आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात आहे.GBS आणि संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.
नागरिकांनी उकळलेले पाणी प्यावे आणि स्वच्छता राखावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
पुढील काही दिवस महत्त्वाचे
GBS चा हा उद्रेक तात्काळ नियंत्रणात आणण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही आजाराच्या लक्षणांबाबत तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.