PCMC : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उलटसुलट राजकीय हालचाली, पवार पुन्हा भाजपमध्ये

पिंपरी-चिंचवड: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रवेश केलेले राज्य संघटक एकनाथ पवार यांनी अखेर भाजपमध्ये पुनरागमन केले आहे. नांदेड येथे भाजपच्या एका विशेष कार्यक्रमात त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाने महायुतीच्या इनकमिंगला बळ मिळाले आहे, तर महाविकास आघाडीत अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पराभवाचा धक्का आणि निर्णयाचा यू-टर्न
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते आपल्या मूळ पक्षाकडे परतताना दिसत आहेत. लोहा कंधार मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी एकनाथ पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

पराभवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पराभवासाठी शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. अखेर त्यांनी भाजपमध्ये पुनरागमन करत स्वगृही परतण्याचा निर्णय जाहीर केला.

भोंडवे यांच्या पाठोपाठ पवार यांचाही युटर्न
चिंचवड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी “मी मूळचा राष्ट्रवादीच, आणि अजित पवार गटातच आहे” असे सांगत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता त्याचप्रमाणे एकनाथ पवार यांनीही शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

नांदेड येथे भाजप प्रवेश; मोठ्या नेत्यांची उपस्थिती
पश्चिम महाराष्ट्र विभाग बैठकीदरम्यान नांदेड येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत एकनाथ पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते.

यावेळी एकनाथ पवार म्हणाले,
“माझ्या पराभवासाठी कोण जबाबदार आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे मी आता स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे.”

त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीच्या गोटात उत्साह निर्माण झाला असून, महापालिका निवडणुकीपूर्वी आणखी काही नेते स्वगृही परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment