महावितरणचा नवा नियम ग्राहकांसाठी अडचणीचा, सूर्यघर योजनेला धोका?

पुणे : केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सौर यंत्रणा बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, महावितरणने तयार केलेल्या वीज युनिटचा हिशेब ठेवणाऱ्या टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर च्या नव्या निकषांमुळे ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी, ग्राहकांचे वीजबिल शून्य होण्याऐवजी त्यांना नेहमीप्रमाणे बिल भरावे लागणार आहे. पुणे परिमंडळात आतापर्यंत ३१ हजार टीओडी मीटर बसवले गेले आहेत.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सौर यंत्रणा बसवलेल्या ग्राहकांनी दिवसभर तयार झालेली वीज महावितरणच्या ग्रीडमध्ये द्यावी लागते. ग्राहकाने दिवस-रात्र वापरलेली वीज, सौर यंत्रणेतून तयार केलेल्या युनिटमधून वजा करून उर्वरित युनिटचे पैसे भरावे लागतात. तयार केलेली वीज वापरलेल्या विजेपेक्षा जास्त असल्यास तेवढे युनिट ग्राहकाच्या खात्यात जमा राहतात, आणि आर्थिक वर्ष संपेपर्यंत या शिल्लक युनिटचा वापर ग्राहक करू शकतो. वर्षअखेर अतिरिक्त युनिटच्या बदल्यात महावितरण ग्राहकाला पैसे देते.

ही यंत्रणा सुरळीत राबवण्यासाठी नेटमीटर बसवले जात होते, मात्र आता महावितरणने सर्व ग्राहकांना स्मार्ट नेट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हे मीटर टीओडी म्हणजेच टाइम ऑफ डे मीटर असणार आहेत.

नव्या टीओडी मीटरमुळे ग्राहकांना होणारा फटका
रूफटॉप रेग्युलेशन्स २०१९ नुसार, टीओडी मीटर असलेल्या ग्राहकांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत तयार झालेली सौर वीज कमी मागणी असलेल्या काळातील (ऑफ पीक) वीज म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे आधीच्या नियमानुसार युनिटची भरपाई (दिवसभर वापरलेल्या युनिटमधून वजाबाकी) होणार नाही.

सौर यंत्रणेमधून वीज प्रामुख्याने दिवसा तयार होते, तर घरगुती ग्राहकांचा वीज वापर संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत अधिक असतो. त्यामुळे टीओडी मीटरमुळे ग्राहकांना पूर्ण भरपाई मिळणार नाही आणि त्यांना बिल भरावे लागेल.

महावितरणचा महसूल कमी होऊ नये म्हणून हा निर्णय?
महावितरणने नुकत्याच सादर केलेल्या वीजदरवाढ प्रस्तावात कमी मागणी असलेला वेळ (ऑफ पीक) सकाळी ९ ते संध्याकाळी ५ असा निश्चित केला आहे. त्यामुळे या वेळेत तयार झालेली सौर वीज जर त्याच वेळी न वापरली गेली, तर ती ग्राहकाच्या खात्यात शिल्लक राहील. वर्षअखेर त्या युनिटसाठी महावितरण फक्त ३ ते ३.५ रुपये प्रति युनिट दराने पैसे देईल, तर संध्याकाळी ६ ते सकाळी ९ दरम्यान ग्राहकाने वापरलेल्या विजेसाठी त्याला जास्त दराने बिल भरावे लागेल.

सौर यंत्रणा बसवल्याने ग्राहकांचे वीजबिल शून्यावर येणार असल्याने महावितरणच्या महसुलात घट होऊ शकते. त्यामुळेच टीओडी मीटरद्वारे या योजनेच्या मूळ उद्दिष्टावर परिणाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.

Leave a Comment