पुणे: आंबेगाव बुद्रुक येथे साकारण्यात आलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून, येत्या १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.
या भव्य सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत शिवसृष्टी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती शिवसृष्टी व्यवस्थापक अनिल पवार यांनी दिली.
पर्यटकांनी नोंद घ्यावी!
दररोज अनेक शाळा, पर्यटक आणि नागरिक शिवसृष्टीला भेट देतात. मात्र, आगामी लोकार्पण सोहळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस पर्यटकांसाठी प्रवेश बंद राहणार आहे.
त्यानंतर, २० फेब्रुवारीपासून पर्यटकांना शिवसृष्टी पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हे नियोजन लक्षात घेऊन आपली भेट नियोजित करावी, असे आवाहन शिवसृष्टी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.