पिंपरी: वाढदिवसाचा आनंद उत्साहात साजरा होत असताना, एका किरकोळ वादाने गंभीर वळण घेतल्याने एकाचा बळी गेला. गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास देहूरोडमधील आंबेडकरनगर येथे घडलेल्या या घटनेत विक्रम गुरव स्वामी रेड्डी (वय ३७) यांचा गोळीबारात मृत्यू झाला. या घटनेबाबत नंदकिशोर रामपवित्र यादव यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, शब्बीर शेख आणि फैजल शेख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेचा संपूर्ण घटनाक्रम:
नंदकिशोर यादव यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस गुरुवारी होता. या निमित्ताने घराबाहेर मंडप उभारून जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नातेवाईक आणि लहान मुले उपस्थित होती. सर्वजण आनंदाने वाढदिवस साजरा करत असताना अचानक शब्बीर शेख आणि फैजल शेख या दोघांनी येऊन नंदकिशोर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. “तुम्ही खूप मोठे झाले काय?” असे म्हणत त्यांनी नंदकिशोर यांना खुर्चीने मारहाण केली.
भांडणाचा तणाव वाढत असताना, विक्रम रेड्डी हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. मात्र, आरोपींनी चिडून जाऊन त्यांच्यावर थेट गोळी झाडली. गोळी थेट त्यांच्या छातीत लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढे पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलवण्यात आले. पण दुर्दैवाने, उपचारादरम्यान रात्री दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, देहूरोड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.