डाळींच्या बाजारभावात मोठी घसरण !

डाळींच्या बाजारभावात मागील काही महिन्यांपासून मोठी घसरण झाली आहे. तूरडाळीच्या दरात प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांनी घट झाली असून, चणाडाळ आणि उडीद डाळीचे दरही कमी झाले आहेत. वाढीव उत्पादनामुळे हे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे.

उत्पादन आणि दरातील घसरण
कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि विदर्भातील तूरडाळीचा हंगाम सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढला आहे. परिणामी, गेल्या दोन महिन्यांत तूरडाळीच्या दरात प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांनी घट झाली आहे.

यंदा जून-जुलै महिन्यात तूरडाळीचे दर कमाल १७५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले होते. मात्र, नोव्हेंबरमध्ये हे दर १० रुपयांनी कमी झाले आणि सध्या घाऊक बाजारात तूरडाळीचे दर १०७ ते १३० रुपये प्रतिकिलो दरम्यान आहेत.

डाळींचे सध्याचे बाजारभाव
तूरडाळ: १०५ ते १२० रुपये प्रतिकिलो
चणाडाळ: ७५ ते ८० रुपये प्रतिकिलो
उडीद डाळ: १०० ते ११० रुपये प्रतिकिलो
आवक आणि उत्पादन वाढीचा अंदाज
यंदाच्या हंगामात देशभरात तूरडाळीचे उत्पादन तब्बल ४४ लाख टन होण्याची शक्यता आहे. सध्या पुण्यातील मार्केट यार्ड घाऊक बाजारात दररोज ८० ते १०० टन तूरडाळ दाखल होत आहे. पुढील काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता असल्याने दर कमी होण्याची शक्यता व्यापारी व तज्ञांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र डाळ उत्पादनात आघाडीवर
सध्या महाराष्ट्र डाळ उत्पादनात आघाडीवर असून, येत्या काळात भारत या उत्पादनात आत्मनिर्भर होईल, असा विश्वास पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. त्यांनी भारतीय डाळी आणि धान्य संघटनेच्या वतीने आयोजित भारतीय डाळी परिषदेत “समृद्धीसाठी डाळी – शाश्वततेसह पोषण” या चर्चासत्रात सहभाग घेतला.

सरकार, शेतकरी, संशोधक आणि उद्योग भागधारकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास डाळवर्गीय पिकांचे उत्पादन आणखी वाढू शकते. संशोधन आणि पायाभूत सुविधांसाठी अधिक गुंतवणूक झाल्यास भविष्यात डाळीच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment