शिरूर तालुक्यातील निमोणे येथे बोलेरो गाडीच्या धडकेत एक युवक मृत्युमुखी पडला, तर एक मुलगी जखमी झाली. या अपघातात शंतनु सोमनाथ जाधव (वय १८, रा. निमोणे, ता. शिरूर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला, तर सानिका सचिन कांबळे (वय १६, रा. गारमळा, मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) या जखमी झाल्या.
अपघाताचा घटनाक्रम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी २०२५ रोजी निमोणे येथे हा अपघात घडला. सोमनाथ जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या स्कूटीवरून (क्रमांक MH-12 UY-0951) मुलगा शंतनु आणि साडूची मुलगी सानिका यांना गुनाट येथून आणण्यासाठी निमोणे-गुनाट रस्त्याने जात होते.
नायरा पेट्रोल पंपाजवळ आल्यावर त्यांना शंतनु आणि सानिका रस्त्याच्या कडेला चालताना दिसले. त्यामुळे सोमनाथ जाधव यांनी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गाडी लावून थांबले. शंतनु आणि सानिका स्कूटीजवळ आल्यावर जाधव लघुशंकेसाठी बाजूला गेले. याच वेळी, गुनाट बाजूकडून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो गाडीने दोघांना जोरात धडक दिली.
या धडकेत शंतनु गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला, तर सानिका जखमी झाली. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला.
पोलिसांची कारवाई सुरू
या प्रकरणी अज्ञात बोलेरो गाडीवरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक झेंडगे करत आहेत.