पुणे : पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेसच्या डब्याला शुक्रवारी सायंकाळी कर्जतजवळ पळसदरी येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली.
प्रवाशांनी तत्परता दाखवत ट्रेन थांबवली
आगीचा धूर आणि ज्वाळा दिसताच प्रवाशांनी चेन पुलिंग करून गाडी थांबवली. इंजिनपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या डब्याच्या खाली ही आग लागल्याचे निदर्शनास आले. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला तात्काळ माहिती दिली तसेच, खाली उतरू नये, असे इतर प्रवाशांना सतत आवाहन करत राहिले.
रेल्वे प्रशासनाच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला
रेल्वे प्रशासनाच्या त्वरित हस्तक्षेपानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर काही वेळाने गाडी पुन्हा पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. मात्र, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
रेल्वे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गाडीच्या डब्याला आग लागण्याचे नेमके कारण काय, याचा शोध रेल्वे प्रशासनाकडून घेतला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.