व्हॅलेंटाइन डे वर लग्नाचा बार उडवला! पुण्यात ३५ जोडप्यांची अनोखी कहाणी

Pune News : प्रेमाचा उत्सव मानला जाणारा १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे’ यंदा अनेक प्रेमी युगुलांसाठी आयुष्यभर लक्षात राहील असा दिवस ठरला. या खास दिवशी ३५ जोडप्यांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या नव्या जीवनाची सुरुवात केली.

विश्‍वजित भोईटे आणि डॉ. प्रज्ञा सरगडे हे त्यापैकी एक जोडपे. एक अभियंता आणि दुसरी डॉक्टर, गिर्यारोहणाच्या छंदामुळे दोघांची ओळख झाली. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर काहीसा विरोध असलेल्या कुटुंबीयांनी अखेर या नात्याला मान्यता दिली आणि विवाहासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ हा शुभमुहूर्त ठरवण्यात आला. कुटुंबाच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने त्यांनी विवाहबद्ध होत नव्या जीवनास प्रारंभ केला.

फक्त विश्‍वजित आणि प्रज्ञाच नव्हे, तर आणखी ३५ जोडप्यांनीही हा ‘गुलाबी’ मुहूर्त साधत लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. ‘व्हॅलेंटाइन डे’ हा दिवस प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळेच अनेक जोडपी या दिवशी लग्न करण्यास प्राधान्य देतात. पुणे स्टेशनजवळील विवाह नोंदणी कार्यालयात सकाळपासूनच नवविवाहित जोडप्यांसोबत त्यांच्या कुटुंबीयांची मोठी उपस्थिती दिसून आली. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या तसेच कुटुंबाच्या संमतीने विवाह करणाऱ्या अनेक जोडप्यांनी या दिवशी विवाह नोंदणी केली.

विवाह नोंदणी कार्यालयासमोर खास रांगोळी रेखाटण्यात आली होती. महाविद्यालयीन जीवनात ओळख झाल्यानंतर शिक्षण पूर्ण करून नोकरी लागल्यानंतर परवेझ आणि हेमा (नावे बदललेली आहेत) यांनी लग्नाचा निर्णय घेतला. कुटुंबीयांचे मनपरिवर्तन करून त्यांनी आज विवाह केला. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे शमसुद्दीन तांबोळी यांच्यासह अनेक मान्यवरांनी नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद दिले.

प्रेम आणि सहजीवनाची नवीन सुरूवात

“ट्रेकिंगच्या निमित्ताने आमची ओळख झाली. पुढे फिरण्याचा छंद आणि खवय्येगिरीमुळे मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. कालांतराने कुटुंबीयांचाही विरोध मावळला आणि आज आम्ही विवाहबद्ध झालो.”

विश्‍वजित भोईटे व डॉ. प्रज्ञा सरगडे

विवाह नोंदणी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनीही या खास प्रसंगी आनंद व्यक्त केला.

“व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी विवाह करण्याची अनेक जोडप्यांची इच्छा असते. यंदा ३५ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी अर्ज केला होता आणि सकाळपासूनच कार्यालयात वधू-वरांसह त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.”

संगीता जाधव, अधिकारी, विवाह नोंदणी कार्यालय

प्रेमाचा उत्सव आणि विवाहसोहळ्याचा संगम असलेल्या या दिवसाने अनेक जोडप्यांसाठी नवीन जीवनाचा शुभारंभ घडवला. विवाहसोहळ्याचे हे विशेष क्षण त्यांच्यासाठी आयुष्यभर अविस्मरणीय ठरतील.

Leave a Comment